सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील विनायक विजय हाके एका पोल्ट्रीफार्मच्या टेम्पोवर चालक आहेत. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते बोरगाव येथून अंडी घेऊन सातारला आले होते. मध्यरात्री त्यांनी सातारा येथील मंगळवार पेठेत अंडी दिली. त्याचे ५३ हजारांचे पेमेंट घेतले आणि टेम्पो घेवून पुन्हा बोरगावकडे निघाले. यावेळी त्यांच्यासमवेत एकजण सहकारी होता.
सातारा : सातारा तालुक्यातील शेंद्रे गावच्या हद्दीत तीन दुचाकीवरून आलेल्या नऊजणांनी एका टेम्पोचालकाच्या डोळ्यात चटणी टाकून लुटून त्याच्याकडील ५३ हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नऊजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील विनायक विजय हाके एका पोल्ट्रीफार्मच्या टेम्पोवर चालक आहेत. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते बोरगाव येथून अंडी घेऊन सातारला आले होते. मध्यरात्री त्यांनी सातारा येथील मंगळवार पेठेत अंडी दिली. त्याचे ५३ हजारांचे पेमेंट घेतले आणि टेम्पो घेवून पुन्हा बोरगावकडे निघाले. यावेळी त्यांच्यासमवेत एकजण सहकारी होता.
बोगदामार्गे शेंद्रे येथे आले आणि महामार्गावरील भुयारी पूल ओलांडून ते भवानीमाता मंदिरासमोरील सेवारस्त्याने निघाले असतानाच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या काहींनी टेम्पो थांबविला. 'तुमच्या टेम्पोने सोनगाव येथे एकाला धडक दिली आहे,' असे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरु असतानाच तेथे आणखी दोन दुचाकीवरून सहाजण आले आणि त्यांनी हाके यांना टेम्पोतून खाली उतरवत दमदाटी करतच मारहाण केली. यावेळी या सर्वांनी हाके आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात चटणी पूड टाकली. याचवेळी नऊजणांनी टेम्पोत असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत असणारी ५३ हजारांची रोकड आणि हाके यांच्या खिशातील एक मोबाईल हँडसेट लूटून पसार झाले.
थोड्या वेळानंतर सावरलेल्या हाके यांनी याची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. या माहितीनंतर नऊजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.