फलटण शहरातील गजानन चौकात भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी डी.एड चौक फलटण याठिकाणी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करीत जशास तसे उत्तर दिले.
दसऱ्या दिवशीच अशी घटना घडल्याने फलटण शहरासह तालुक्याच्या विविध भागात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
एकीकडे भाजपच्या वतीने राष्ट्रवादी चे नेते तथा मा. सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला असता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डि .एड चौकात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध केला. आगामी काळात भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पोलीस प्रशासनाने फलटण शहरात बंदोबस्त तैनात केला आहे.
शांतताप्रिय फलटण शहराला गालबोट : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया
कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या आचारांचा विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या फलटण शहर व तालुक्यामध्ये दसऱ्या दिवशी घडलेल्या अशा घटनेमुळे शांतताप्रिय फलटण शहराला गालबोट लागण्याची प्रतिक्रिया फलटण मधील अनेक जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.