फलटण प्रतिनीधी:- शहरातील मोबाईल चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीस शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकुण ३ लाख २ हजार ५०० रूपये किंमतीचे चोरलेले १२ मोबाईल फोन व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१/३/२०२४ रोजी डेक्कन चौक येथे युसुफ मन्सुर महात (वय ५२ वर्षे, रा. कोळकी, फलटण) हे चालत जात असताना, तीन अनोळखी आरोपींनी दुचाकीवर येऊन त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि नितीन शिदे यांच्याकडे देण्यात आला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि. नितीन शिंदे आणि त्यांच्या पथकास मोबाईल फोन चोरीच्या घटनांबाबत आढावा घेऊन, चोरांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. माहितीच्या आधारे फलटण शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण कार्यवाहीमध्ये संशयीत आरोप निलेश अनिल जाधव (वय २१ वर्षे) निखील तुकाराम गदाई (वय १९ वर्षे) व मंगेश संजय गंगावणे (वय २१ वर्षे) तिघे रा. सोमवार पेठ, फलटण यांना अटक करण्यात आली. या संशयीत आरोपींना दि.२२/३/२०२४ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता दि.२४/३/२०२४ रोजी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सदर आरोपींकडून अंदाजे एकुण ३ लाख २ हजार ५०० रूपये किंमतीचे चोरलेले १२ मोबाईल फोन आणि चोरांच्या टोळीने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख,अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल,उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नितीन शिंदे, स.पो.फी. संतोष कदम, पो.ह चद्रकांत धापते, सचिन जगताप, पोशि. सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे यांनी केली.