कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात सर्वसामान्य लोकांना धीर देण्याऐवजी संधीचे सोने करत काहीजण मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा जाणवत आहे. या परस्थितीचा गैरफायदा घेत बारामती (जि. पुणे) येथील एका टोळी डूप्लीकेट इंजेक्शन तयार करत होती. या टोळीचा पोलीस व अन्न भेसळ विभागाकडून नुकताच पर्दाफाश झाला. या कारवाईत खटाव तालुक्यातील दोन सुपुत्रांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. यामध्ये पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश विधाते (खटाव) व अन्न भेसळ विभागातील निरीक्षक विजय नांगरे (तडवळे) या दोघांचा समावेश आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बारामती येथील एक टोळी रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये पॅरासिटॅमॉल गोळ्यांचे पाणी भरून इंजेक्शन तयार करत होते. बनावट इंजेक्शन तयार करत असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बनावट खरेदीदार पाठवून एका इंजेक्शनची किंमत 35 हजार प्रमाणे खरेदी करण्यासाठी पाठविले. सिद्धेश्वर घरत व शंकर भिसे हे दोघे फॉर्च्युनर गाडीमधून एमआयडीसीतील पेन्सिल चौकात आले असता पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सपोनि महेश विधाते, हवालदार राजेंद्र जाधव, रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये दिलीप गायकवाड हा या प्रकरणाचा सूत्रधार असून भिगवन येथील संदीप गायकवाड हा बनावट इंजेक्शन तयार करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी घरत, गायकवाड, दादा भिसे (काटेवाडी), संदीप गायकवाड (भिगवन) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणामध्ये डॅशिंग कामगिरी करणार्या सपोनि विधाते यांच्याकडेच तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत.
जप्त केलेला मुद्देमालाची तपासणी करण्याचे काम तडवळे येथील विजय नांगरे यांच्याकडे आले. ते पुणे जिल्ह्यात अन्न भेसळ विभागाचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वरील बनावट इंजेक्शनची तपासणी करून आरोपींवर कठोर कारवाई कशाप्रकारे होईल, अशा पद्धतीने कारवाई केली. ही बाब सोशल मीडियावर समजताच विधाते व नांगरे यांचे खटाव, तडवळेसह संपूर्ण तालुक्यातील मान्यवरांनी कौतुक केले.