फलटण - फलटण तालुक्यातील निरगुडी गावच्या हद्दीत कित्येक वर्ष दारू विक्री बेकायदेशीरपणे राजरोस सुरू असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सदर परिसरातील नागरीक व महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैद्य धंद्यामुळे लहान मुले व युवा वर्ग याकडे पूर्णपणे ओढला जावून, भावी पिढी पुर्णतः बरबाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अवैद्य व बेकायदेशीर धंद्यामुळे परिसरामध्ये रोज गुंडगिरी, दादागिरी अशी कृत्ये सुरु असून त्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. पण बदनामीच्या भितीने याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस कोणीही करीत नाही. तसेच या गंभीर बाबीकडे संबंधीत हद्दीतील पोलीस यंत्रणा पाठ फिरवीत असल्याची चर्चा आहे.
निरगुडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागे सदर हद्दीतील बेकायदेशीरपणे तसेच राजरोस सुरु असणारे दारु विक्री व असे अवैद्य धंदे ताबडतोब बंद करावेत व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सद्यस्थितीत सुरू असलेल्या गैरकृत्यांकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न ग्रामस्थानकडून विचारला जाऊ लागला आहे.
या संदर्भात फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निरगुडी गावातील महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेऊन अवैध दारु विक्रीचा ठराव मंजूर करावा अन्यथा महिला वर्गाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.