कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी 2920 रुपये येत्या 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफआरपी या कायद्याची अंमलबजावणी का करत नाहीत.
कराड : कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी 2920 रुपये येत्या 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफआरपी या कायद्याची अंमलबजावणी का करत नाहीत. जर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर शेतकरी योग्य वेळी कारखानदारांना जागा दाखवतील, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी बोलून दाखविले.
यावेळी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे पाटण तालुका अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्यावतीने एकरकमी एफआरपी धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब देसाई म्हणाले, बळीराजा शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. एकरकमी एफआरपी या विषयावर कारखानदारांनी लवकरात लवकर तोडगा न काढल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही बाळासाहेब देसाई यांनी यावेळी बोलताना दिला.