फलटण (प्रतिनिधी) — माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. यावेळी फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते. या घडामोडीमुळे राजे गटाला मोठा धक्का बसला असून शहरातील राजकीय समीकरणांमध्ये या प्रवेशामुळे मोठे वळण आले आहे.
सनी अहिवळे हे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शहरात सामाजिक आणि विकासकामांच्या माध्यमातून ठसा उमटवला होता. मात्र अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
फलटण शहरातील अनेकांना आश्चर्य वाटणाऱ्या या निर्णयामुळे नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सनी अहिवळे यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर मजबूत संघटनात्मक बळ मिळाले आहे, तर रामराजे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यात सनी अहिवळे यांनी अजित पवार यांच्या विकासदृष्टीवर विश्वास व्यक्त केला असून, “फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम कारणार असल्याचे सांगितले.











