नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले आहेत. या कॉनव्हॅक्स मिररमुळे अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक चौक व वळणावर होण्याऱ्या अपघातांना आळा बसणार असून त्यांच्या या संकल्पनेचे सोमवार पेठेसह शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
कराड : येथील नगरसेवक सुहास जगताप यांच्या कल्पनेतून सोमवार पेठेतील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले आहेत. या कॉनव्हॅक्स मिररमुळे अंतर्गत रस्त्यावरील धोकादायक चौक व वळणावर होण्याऱ्या अपघातांना आळा बसणार असून त्यांच्या या संकल्पनेचे सोमवार पेठेसह शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
या कॉनव्हॅक्स मिररचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका अंजली कुंभार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी, डॉ. रणजित पाटील म्हणाले, सोमवार पेठेतील चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूकीची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी कॉनव्हॅक्स मिरर बसवण्याची आवश्यकता होती. सुहास जगताप यांनी ही गरज ओळखून समाजोपयोगी केलेले हे काम कौतुकास्पद आहे.
प्रास्ताविकात दुष्यंत देशपांडे म्हणाले, नगरसेवक सुहास जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांनी त्याप्रमाणे आवश्यक विकासकामेही केली आहेत. सोमवार पेठेमध्ये नागरिकांची सातत्याने ये-जा असते. तसेच प्रीतिसंगम घाटाकडून जाणारी वाहने सोमवार पेठेतून वळवण्यात आली आहेत. त्यामुळे या वाहनांच्या वाहतूकीचा मोठा ताण या पेठेत येतो. पेठेत 15 धोकादायक चौक असून वाहनांच्या गर्दीमुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असतात. त्यामुळे चौकातून रस्ता ओलांडताना वाहनधारकांना इतर वाहनांचा अंदाज येण्यासाठी कॉनव्हॅक्स मिररची आवश्यकता होती. ते बसवल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.
सुहास जगताप म्हणाले, पुणे-मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये अशा प्रकारचे मिरर बसवण्यात आले आहेत. सोमवार पेठेतील वाढत्या वाहतूकीमुळे याठिकाणच्या चौकामध्ये अशा कॉनव्हॅक्स मिररची आवश्यकता असल्याचे जाणवले. त्यानुसार येथील 15 धोकादायक चौकांमध्ये कॉनव्हॅक्स मिरर (बर्हिवर्क आरसे) बसवण्यात आले असून या मुळे अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे.
यावेळी एन.आर. पाटील, शिवाजीराव जगताप, मोहन आरे, मिलिंद गरूड, विराग जांभळे, वासुदेव कुलकर्णी, शहाकाका, नंदकुमार ढवळीकर, विजय पटवर्धन, येळगावकर, पवार आदी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.