फलटण (प्रतिनिधी) :
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने डी. पी. चोरणारी टोळी जेरबंद करण्याची कामगिरी करत तीन चोरट्यांना अटक केली आहे. संतोष जगन्नाथ घाडगे, सागर युवराव घाडगे व किरण भीमराव घाडगे (सर्व रा. मलटण, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या डी. पी. चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने परिसरातील डी. पी. चोऱ्यांच्या घटनांबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन या चोऱ्यांमधील संशयित संतोष जगन्नाथ घाडगे, सागर युवराज घाडगे, किरण भिमराव घाडगे (सर्व रा मलटण ता फलटण जि सातारा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.
या तपासात त्यांनी इतर साथीदारांसह फलटण तालुक्यात मध्ये तसेच वाठार पोलीस ठाणे व लोणंद पोलीस ठाणे व फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमधील डी. पी. चोरी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध ठिकाणी चोरी केलेली सुमारे 3 लाख 80 हजार रुपये किमतीचे एकूण 380 किलो वजनाचे तांबे व चोरी करण्यास वापरलेली ओमनी व्हॅन असा एकूण 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यांचा उपास अद्याप सुरू असून अटक आरोपींनी आणखी कोठे काही गुन्हे केले आहेत काय? याचा तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, पोलीस हवालदार अरुण शेंडे, महादेव पिसे, पोलीस नाईक नितीन चतुरे, अमोल जगदाळे, तुषार आडके, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुमार, तुषार नलवडे, हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.