निमसोड : कोरोनाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा संपूर्ण गाव राजकारण, जातपात, लहान-थोर विसरून, एकत्र येऊन, अवघ्या काही मिनिटात गावात शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंबवडेकर एकत्र आले आहेत.
आपण सगळे अतिशय वाईट परिस्थितीतून चाललो आहोत, खूपच दुःखद घटना दुर्दैवाने घडत आहेत. बेड मिळत नाहीत. शासन देखील हतबल झाले आहे, ही सगळी परिस्थिती पाहता, सर्व अंबवडेकर व मुबंई ग्रामस्थानी, आपापल्या परीने, ह्या संकटावर मात करून कोरोना हद्दपार करायचा निर्णय घेतला. गावावर जे कोरोनाच्या महामारीचे संकट कोसळले आहे ते घालवण्यासाठी सर्व अंबवडेकर एकत्र येऊन काही तासात दोन लाख रुपये लोकवर्गणी जमा करून कोविड सेंटरसाठी लागणार्या सर्व मेडिसिन, ऑक्सिजन मशीन, बेड, सॅनिटाईझर, ऑक्सिमिटर, मास्क इत्यादी गोष्टी उपलब्ध करून गावासाठी गावातच कोविड सेंटर उभे केले. यासाठी गावातील डॉक्टर सचिन पवार व डॉक्टर विनोद चव्हाण यांनी गावासाठी विनामोबदला सेवा देण्याचे ठरवलंय आहे, तसेच आरोग्य सेवक, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंबवडे, विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुण सहकारी तसेच शासकीय अधिकारी यांची साथ तसेच मार्गदर्शन कायम खंबीरपणे लाभले.
कोविड सेंटर वर पेशंट साठी लागणार्या नाश्त्याची सोय, पिण्यासाठी फिल्टरचे गरम पाणी, बाथरूम ची सोय, ऑक्सिमीटरची सोय केली आहे. गावामध्ये प्रत्येक दोन दिवसाला सॅनिटाईझर फवारणी होत आहे.
अंबवडेकर जे करतात ते कौतुकास्पद आहे, खरचं आपल्या जीवाची पर्वा न करता गावासाठी एक होऊन जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्णपणे पार पाडत आहेत.
दरम्यान, अंबवडेकरांच्या कार्याचा आदर्श घेऊन शासनावर अवलंबून न राहता प्रत्येक ठिकाणी गावपातळीवर असेच सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे मत महादेव पवार यांनी व्यक्त केले.