मौजे साखरवाडी येथे रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना पोलीसांना संशयास्पद आढळून आलेल्या दोन तरुणांनी फलटण तालक्यातील खुंटे व कांबळेश्वर गावातून इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याचे कबूल केले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 29 रोजी डिव्हिजन रात्रगस्त दरम्यान पहाटे ४ वाजण्याचे सुमारास मौजे साखरवाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना साखरवाडी बाजार पेठ चांदणी चौक येथे पोलीस गाडी पाहून दोन जण शेजारील बोळात लपून बसल्याचे पोलीस पथकास आढळून आले असता त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दोघेजण उडवा उडवीची उत्तर देत असल्याचे लक्षात आले. पोलीसांनी त्या दोघांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावरती १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव पृथ्वीराज रवींद्र जाधव (वय 20 वर्ष, रा. चौधरवाडी,ता. फलटण) व गणेश संदीप खलाटे (वय 19 वर्ष, रा. खुंटे ता. फलटण) अशी असल्याचे सांगून त्यांनी मौजे खुंटे, तालुका फलटण व मौजे कांबळेश्वर तालुका फलटण या गावातून इलेक्ट्रिक मोटर चोरी केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.