फलटण प्रतिनीधी :- फलटण येथे सहा दिवसापूर्वी महसूल विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका कारवाईत भूमी अभिलेख फलटण कार्यालय येथील कनिष्ठ लिपीकास सात हजार रुपयांची लाच प्रकरणी अटक केली आहे.
भूमी अभिलेख फलटण कार्यालय येथील कनिष्ठ लिपीक इब्राहीम मोहम्मदशफी मुलाणी (वय ४९ वर्षे, मुळ रा. हिरवे बुद्रुक ता.जुन्नर जि. पुणे सध्या रा. खेड जिल्हा पुणे) यांनी शेतकरी तक्रारदार यांचे मौजे कोरेगाव तालुका फलटण येथील वडिलोपार्जीत एकत्रीत असलेल्या गट नं.९० ची दि.१७/०१/२०२४ रोजी मोजणी करून सदर मोजणी हद्द दि.२९ रोजी कायम करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करून त्यातील सात हजार रुपये रक्कम मौजे कोरेगाव ता. फलटण येथील शेतकरी तक्रारदार यांच्या मोजणी गटाच्या शेजारी स्वीकारली असताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे.अपर पोलीस अधीक्षक, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे, पो.नि. विक्रम पवार, ला.प्र.वि. सातारा, पो.हवा. नितीन गोगावले, ला.प्र.वि. सातारा,पो हवा निलेश राजपुरे ला.प्र.वि. सातारा, पो शि विक्रम कणसे ला.प्र.वि. सातारा यांनी केली.
लाच मागणी संबंधी तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक, विभाग, सि.स.नं. ५२४/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदर बझार, सातारा येथे अथवा ९५९४५३११००, ९७६३४०६५०० कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१६२-२३८१३९ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ या क्रंमाकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांनी केली आहे.
भूमी अभिलेख फलटण कार्यालय येथील कनिष्ठ इब्राहीम मोहम्मदशफी मुलाणी यांच्यावर यापूर्वी खेड पोलीस ठाणे जि.पुणे येथे गु.र.नं. ११४/२०१७ मध्ये लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.