अल्पसंख्याक समाजाविषयी सतत द्वेषपूर्ण, प्रक्षोभक आणि गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करून मुस्लिम समाजाविरोधात भडकावू वातावरण तयार करणारा सूत्रधार विक्रम पावसकर यांना तातडीने अटक करण्यात यावे
फलटण प्रतिनिधी : सातारा जिल्हयातील पुसेसावळी येथे दि. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात एका निरपराध व्यक्तीचा बळी गेला असून अनेक लोक जखमी झाले आहेत तर अद्यापही काहीजण दवाखान्यात उपचार घेत आहेत. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्याने हल्ला झालेल्या या घटनेची पोलिसांनी सामाजिक कार्यकत्यांना विश्वासात घेऊन हल्ल्याची सर्वसमावेशक सत्यशोधन समिती नेमून चौकशी करण्यात यावी असे सातारा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी पत्र वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा पदाधिकारी गणेश भिसे, जेष्ठनेते सुभाष गायकवाड, विजय वानखेडे फलटण तालुका महिला शहर अध्यक्षा सौ. सपनताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सौ. चित्राताई गायकवाड, दिनकर जगताप, चंद्रकांत गायकवाड, आमीरखान मेटकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पुसेसावळी येथील दोन मशीद जाळण्याचा प्रयत्न झाला असून मोठ्या प्रमाणावर मालमतेचे नुकसान करण्यात आले आहे. तर अल्पसंख्याक समाजाविषयी सतत द्वेषपूर्ण, प्रक्षोभक आणि गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करून मुस्लिम समाजाविरोधात भडकावू वातावरण तयार करणारा सूत्रधार विक्रम पावसकर यांना तातडीने अटक करण्यात यावे.
या हिंसाचारात बळी पडलेल्या निरपराध नवविवाहित तरुणाच्या कुटुंबास तातडीने रुपये 25 लाख इतकी नुकसान भरपाई मिळावी तर झालेले पंचनामे व जबाब दबावाच्या वातावरणात झालेले असल्याने फेरपंचनामे करून सर्व पीडितांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी.
सातारा जिल्ह्यामध्ये मागील सहा महिन्यात सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्याचे निमित्त होऊन हल्ला झालेल्या सर्व घटनांची पोलिसांनी सामाजिक कार्यकत्यांना विश्वासात घेऊन एकत्रित चौकशी करून त्यामागच्या षडयंत्राचा शोध घ्यावा असे शेवटी पत्रात नमूद करण्यात आले आहे.