उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.
देवेंद्र फडणीस म्हणाले की, उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला अल्टरनेट गर्व्हमेंट देतोय. तसा शब्द आम्ही पूर्वीच दिला होता. शिवसेनेचा एक गट, अपक्ष आमच्यासोबत आहेत. तसे एक पत्र राज्यपालांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.