फलटण प्रतिनिधी –
फलटण नगरपरिषद हद्दीत फ्लेक्स व होर्डिंग्ज लावण्यास बंदी असतानाही काही ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची दखल घेत पालिकेने तत्काळ कारवाई करत संबंधित फ्लेक्स काढून जप्त केले.
शहरातील गिरवी नाका परिसरात काही खाजगी संस्थांकडून मोठ्या आकाराचे अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे, पालिकेने स्पष्ट बंदी घातलेली असतानाही ही नियमबाह्य उभारणी करण्यात आली होती. अलीकडील बदलत्या हवामानामुळे वादळ, जोरदार वारे यांचा धोका वाढला असून अशा फ्लेक्समुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात आलेल्या वादळामुळे झाडे व इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते. तसेच मुंबईतील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेत जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. गिरवी नाका परिसरात शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, त्यामुळे अशा फ्लेक्समुळे अपघाताचा धोका वाढतो.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित फ्लेक्स हटवून जप्त केले.
याबाबत मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “फलटण पालिका हद्दीत फ्लेक्सबंदी लागू आहे. यापुढे कोणीही नियमांचे उल्लंघन करून फ्लेक्स लावल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”










