फलटण प्रतिनिधी : मौजे निंबळक येथे दवाखान्यासाठी उसने पैसे दिले नाहीत म्हणून एकाने घरातील सामानाला आग लावल्याची घटना घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनाक १६/४/२०२३ रोजी दुपारी २ ते दिनांक ४/५/२०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान मौजे निंबळक गावाच्या हद्दीत फिर्यादी हनुमंत दशरथ लोंढे (रा. निंबळक तालुका फलटण) यांच्या घरामध्ये नारायण हनुमंत आवटे (रा. निंबळक तालुका फलटण) यांने फिर्यादी यांचा मुलगा शुभम हनुमंत लोंढे यास मुलाच्या दवाखान्यासाठी उसने पैसे मागत होता फिर्यादी यांचा मुलगा शुभम याने नारायण हनुमंत आवटे यास उसने पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या घरातील घरगुती सामान, कपाट, पीओपी लाईट, टीव्ही, लॅपटॉप, कपडे, साड्या घरातील घरगुती सामान इतर सामानाला नारायण हनुमंत आवटे याने दारूच्या नशेत कशाने तरी पेटवून देऊन आग लागून जाळून नुकसान केले अशी फिर्याद हनुमंत दशरथ लोंढे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी नारायण हनुमंत आवटे याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.


















