फलटण | धैर्य टाईम्स | ३१ डिसेंबर २०२४
फलटण येथे सोमवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे अनिकेत बापू टिळक हा भाजी विक्रेता युवक आंबेडकर चौक येथे गोपाल भट्टड यांच्या किराणामालाच्या दुकानाजवळ आपली भाजीचे दुकान लावत होता. त्यावेळी फलटण येथील निर्मलादेवी नागरी पतसंस्थेचे पिग्मी एजंट धोंडीराम रामचंद्र जाधव राहणार सस्तेवाडी, ( ता. फलटण ) यांची रोख रकम ७८५०० आणि पिग्मीची मशीन व कागदपत्रे असणारी काळ्या रंगाची बॅग, रिक्षातून नजर चुकीचे खाली पडली.
ही बॅग रसत्यावरून उचलून अनिकेत टिळक याने तेथील किराणा दुकानदार गोपाळ भट्टड यांना दाखवली व अनिकेतचे मामा नंदकुमार अहीवळे, अध्यक्ष मालोजीराजे भाजी विक्रेता संघ आणि त्यांचे सहकारी कादरभाई बागवान नितीन घोडके, अरुण अहिवळे यांना बोलावून सांगितले. या सर्वांनी ती बॅग उघडून तपासले असता त्यामध्ये रोख रकम पिग्मी मशीन, कागदपत्रे आणि घोडीराम जाधव यांचे आधार कार्ड सापडले.
आधारकार्डवरील पत्त्यावरून त्यांनी सस्तेवाडी येथील सरपंच वाबळे यांना संपर्क करून धोंडीराम जाधव यांना कल्पना देण्यास सांगितले. त्यानुसार धोंडीराम जाधव पिग्मी एजंट यांनी आंबेडकर चौक फलटण येथील गोपाळ भट्टड यांच्या दुकानात येऊन ७८५०० ची रोख रक्कम पिग्मी मशीन आणि कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली. अनिकेतच्या प्रामाणिकपणाचे व्यापाऱ्यांनी आणि भाजी विक्रेत्यांनी त्याचे कौतुक केले.