श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष कै.श्री सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) एका सधन शेतकरी कुटुंबातील फलटण सारख्या खेडेगावातून ताऊन सुलाखून निघालेले बहारदार व्यक्तिमत्व होते. शैक्षणिक सामाजिक स्तरावर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आयुष्यातील प्रत्येक पायरीवर आपण यशाची कमान चढत गेला आपले जीवन हे समाजाप्रती समर्पित होतं काकांचे त्यागमय जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी होते.
निस्वार्थी जीवन जगणाऱ्या सुभाषकांचा समाजातील वेगवेगळ्या लोकांशी अत्यंत जवळचा संबंध होता. शिक्षण सहकार चळवळीतील आपले कार्य अतुलनीय अशा प्रकारचे होते. सर्वसामान्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे आपला समाज सुधारावा यासाठी ते अहोरात्र कष्ट करत होते. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आत्मविश्वासपूर्वक पाऊल टाकले त्यांचे समाजातील सर्व घटकांशी आपुलकीचे संबंध होते. सुभाषकाका प्रत्येकाशी संवाद साधत असत त्यांचा जन्मच ग्रामीण भागात झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेविषयी त्यांना खूप जिव्हाळा होता राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राप्रमाणे कृषी व हॉटेलिंग क्षेत्रात सुभाष काकांनी उत्कृष्ट कार्य करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला होता. त्यांचे वडील कै. कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी ( बेडके) यांनी स्थापन केलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या लहानशा रोपट्याच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाच्या झोपडी पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे कार्य केले त्यांच्या पश्चात हे रोपटे कोमेजून न देता जिद्द परिश्रम चिकाटी यांचे खतपाणी घालून त्याचे रूपांतर अवाढव्य अशा वटवृक्षात केले.
प्रसंगी त्यांना अनेक प्रकारचा त्याग करावा लागला संकटाचा सामना करावा लागला आपल्या पूज्य वडिलांचे स्मरण कायम राहावे म्हणून त्यांच्या नावाने नामदेवराव सूर्यवंशी (बडके) महाविद्यालयाची स्थापना केली व कर्मयोगी नानांच्या विचारांचा व आचारांचा वसा व वारसा आपण पुढे चालवला. सामान्य कडून असामान्य कडे गेलेले एक समर्थ जनहितौशी शोषणमुक्त व मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी धडपडणारे तसेच शिक्षणाच्या मुलगामी विचाराकडे समाजाला नेणारे कर्तुत्व संपन्न व्यक्तिमत्व आपल्या रूपाने आम्हास लाभले. दुसऱ्यांसाठी जगण्यात आपल्या आयुष्याचे सुवर्णपात्र ओसंडत राहिले कवी बा. भ बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरि, सहजपणाने गळले हो । जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळाले हो चराचरे होऊनी जीवन, स्नेहा सम पाजळले हो आपले जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी असे होते आपल्या बोलक्या कर्तुत्वाच्या सावलीखाली वावरताना आम्हास आनंद वाटत होता. आपण निरंतर अबोल झालात आजपर्यंत आपण अनेकांना मदत केली एका हाताने दिलेले दान आपण कधीही दुसऱ्या हाताला कळू दिले नाही. हा आपल्या मनाचा मोठेपणा होता. चंदनाप्रमाणे झिजून आपण संस्थेचा कायापालट केला संस्थेत चालू केलेले उपक्रम त्यामध्ये आलेले यश संस्थेने स्पर्धात्मक युगात घेतलेले गगन भरारी यावरून आपली दूरदृष्टी कल्पकता लक्षात येते. श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज परदेशात नोकरी करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी आपणाबरोबर पत्र व्यवहाराच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्या पत्राच्या माध्यमातून ते विद्यार्थी आपणास सांगताना म्हणतात काका आपल्या शिक्षण संस्थेमुळे आज आम्ही परदेशामध्ये नोकरीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहोत. हे सर्व कथन करताना आपला उर अभिमानाने भरून आला होता.
एक कुशल संस्थाचालक प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक, म्हणून आपण संपादिलेल्या यशाचा आम्हास निश्चितच अभिमान वाटतो. थोरा मोठ्यांचा आदर कसा करावा हे आपणाकडून शिकावे आपण श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे आधारवड होता. आपणास विसरणं कदापी अशक्य आपल्याबद्दल बोलताना नेहमी मनात आदराची भावना येत राहते एवढा आपला मोठेपणा होता. विनयशीलता व संयमी स्वभाव असं आपलं व्यक्तिमत्व होतं जनमानसातला नेता अशी प्रतिमा मनामनात निर्माण करणारे नेतृत्व आम्हा फलटणकरांना आपल्या रूपाने लाभले हे आमचे भाग्यच होय आपल्याबद्दलच्या अनेक आठवणी आज मनात घर करून आहेत आपण अनेकांचे जीवन फुलवले त्यांना आधार दिला मायेची उब दिलीत आणि आपण मात्र अनंत प्रवासासाठी या जगातून निघून गेला कधीही न परतण्यासाठी आम्ही निःशब्द आहोत. फलटण तालुक्यातील सर्व क्षेत्रातील लोकांकरीता आपण दीपस्तंभ प्रमाणे होता. पूर्व सूचना आल्यासारखं अगदी आपण हसत हसत तडका फडकी या जगातून निघून गेलात अगदी मृत्यूनही लाजावं असं आपलं मोठेपण संस्थेचे हित जपणारा तुमचा पिंड आयुष्यभर संस्थेची धुरा वाहून आपण मौलिक भर टाकली आपणास विसरणे कदापि अशक्य आपल्या कर्तुत्वाच्या सावलीखाली वावरत असताना तुम्ही सदैव आहात असं वाटत राहतं अशा या त्यागी परिपूर्ण बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल म्हणावेसे वाटते जनसेवेचे बांधून कंकण समर्पित केले अवघे जीवन कष्टातून फुलविले विद्येचे बन स्मृतीस तुमच्या शतशः वंदन सर्व समाजाच्या सुखदुःखात सामील होणे हा त्यांचा सर्वात मोठा सदगुन होता .संस्थेच्या जडणघडणीत आपला सिंहाचा वाटा होता.
स्पष्ट स्वभाव काहीही जाखून न ठेवण्याच्या वृत्तीमुळे स्वतःचा स्वाभिमान कधीही ढळू न देता आयुष्यात एक एक मानाच्या पायऱ्या आपण वर चढत गेला आधुनिक नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण व सौ वेणूताई चव्हाण यांच्या बद्दल आपण अनेक आठवणी सांगायचा या आठवणी सांगताना आपल्या डोळ्यातून अश्रू ठिपकायचे तुमचं या दोघांवरचं प्रेम सुचित व्हायचं. सन 2007 मध्ये फलटण तालुका व परिसरातील पहिले औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (डी फार्मसी) सुरू करून वैद्यकीय शिक्षणामध्ये पहिले पाऊल ठेवले यावरून आपल्या दूरदृष्टीची कल्पकता येते. आपण इथल्या प्रत्येक श्रीराम सेवकावर मनापासून प्रेम केलं हा तुमचा स्वभाव आम्हाला खूप भावला आपल्या पवित्र स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन.
प्रा. सुभाष यादव,
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व जुनियर कॉलेज, फलटण.