ठोसेघर, ता. सातारा येथे तीन बछड्यासह वाघीण फिरत असत्याला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओची गंभीर दखल घेऊन सातारा तालुका वन विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ठोसेघर व चाळकेवाडी परिसरात शोधमोहीम हाती घेतली असता, या परिसरात बछड्यासह वाघिणीच्या कोणत्याही पाऊलखुणा, विष्ठा अथवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत.
सातारा : ठोसेघर, ता. सातारा येथे तीन बछड्यासह वाघीण फिरत असत्याला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओची गंभीर दखल घेऊन सातारा तालुका वन विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ठोसेघर व चाळकेवाडी परिसरात शोधमोहीम हाती घेतली असता, या परिसरात बछड्यासह वाघिणीच्या कोणत्याही पाऊलखुणा, विष्ठा अथवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत. संबंधित व्हिडिओ हा आपल्या भागातील नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले आहे.
वन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ठोसेघर परिसरात बछड्यासह वाघीण फिरत असल्याचा व्हिडिओ प्रसारीत झाल्यामुळे सातारा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत वन विभागाचे वनक्षेत्रपाल सातारा, वनपाल प्रशांत पडवळ, वनरक्षक राजकुमार लगा, मारुती माने आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथकाने मंगळवारी रात्री १० ते ३ वाजेपर्यंत तसेच बुधवारी सकाळी ठोसेघर व चाळकेवाडी पठार परिसरात शोध मोहीम हाती घेतली असता, त्या ठिकाणी वाघिणीच्या पाऊलखुणा अथवा विस्टा कोठेच आढळून आली नाही. त्या ठिकाणी बछड्यासह वाघिणीचा वावर असल्याचा एकही अस्तित्वजन्य पुरावा दिसून आला नाही.
सातारा तालुक्यातील काही भागात बिबट्याचे दर्शन होत असते. बछड्यासह वाघिनीच्या वावरा संदर्भात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक तज्ञांशी चर्चा केली असता आणि प्रसारित होणाऱ्या व्हिडिओचे बारकाईने अवलोकन केले असता, ठोसेघर परिसरात बछड्यासह वाघिणीचा वावर ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. साताऱ्या सारखाच, तेच व्हिडिओ शिरूर तालुक्यात एक वाघीण तीन बछड्यासह फिरत असतानाचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्यासंदर्भात शिरूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन युवकांना शोधून काढून समज दिली आहे. हाच व्हिडिओ संगमनेर तालुक्यात मागच्या आठवड्यात प्रसारित झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला व्हिडिओ हा ठोसेघर परिसरातील नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिला आहे.