फलटण प्रतिनिधी: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार फलटण तालुक्यातील मराठा समाज व इतर खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. सर्वेक्षण युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी फलटण तालुक्यात ९०० प्रगणक नेमण्यात आले आहेत अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. ३१ जानेवारी पर्यंत कामकाज चालणार आहे.
सर्व्हेतील माहितीची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्याने राज्य शासनाने सवेर्र्क्षणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे. त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन असून, ते वापरण्याचे प्रशिक्षण आयोगामार्फत देण्यात आले होते. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल ऑफिसर तर नायब तहसीलदार हे सहायक नोडल ऑफिसर आहेत. हे दोघेही शहरी तसेच ग्रामीण भागासाठी काम पाहणार आहेत. सर्वेक्षणासाठी आवश्यकतेनुसार तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगवाडी शिक्षिका व इतर शासकीय प्रगणक-कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणावेळी प्रगणकांकडून १८२ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्या प्रश्नावलीमध्ये मूलभूत माहिती, कौटुंबिक प्रश्न, आर्थिक व सामाजिक स्थिती, आरोग्यविषयक माहितीसंबंधित प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून द्यायचे आहेत. ही प्रश्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, आणि गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचे यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.