फलटण प्रतिनिधी : 28: एप्रिल, धैर्य टाईम्स क्राईम स्पेशल
तीन जणांनी आम्ही पोलीस असल्याची बतावणी करत शहरात किरकोळ खरेदी करण्यासाठी आलेल्या एक जणाची १ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीची सोन्याची चैन हातचालाखी करत लंपास केल्याची घटना फलटण शहरात घडली असून तीन अज्ञात चोरट्यांचे विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दत्तराज शिवाजीराव फडतरे (कायमचा पत्ता रा फडतरवाडी ता फलटण जि सातारा सध्या रा रामकुंज अपार्टमेंट तळमजला लक्ष्मीनगर फलटण) हे कामानिमित्ताने डि.एड चौक नजीक असणारे सिटी बाजार येथे किरकोळ खरेदी करीता गेले असता. खरेदी करून घरी परत येत असताना सिटी बाजार ते डिएड चौक दरम्यान असणारे रोडवर एक व्यक्ती थांबलेला होता, त्याने फिर्यादी फडतरे यांना पाहूण गाडी थांबण्यास सांगितले. त्यामुळे फडतरे यांनी गाडी थांबवली असता त्या व्यक्तीने त्याच्या जवळील पोलीसाचे ओळखपत्र दाखवून "मी पोलीस असून पुढे नाकाबंदी चालू असून तुमच्या जवळ असणारे सोने, चांदी तसेच इतर काही मौल्यवान वस्तू असतील तर ते तुम्ही काढून रूमालात बांधून ठेवा, पुढे गेल्यावर ते जप्त होईल" असे सांगितले. लगेचच तेथे आणखी दोन व्यक्ती आले, त्यांनी पण फिर्यादी फडतरे यांना "आम्ही पोलीस असून तुम्ही लवकर तुमचे सोने, चांदी व मौल्यवान वस्तू काढून ठेवा" असे म्हणाले. त्यामुळे फडतरे यांनी भितीपोटी गळ्यात असलेली १ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीची सोन्याची चैन त्यांच्याकडील असलेल्या रूमालात ठेवली. त्या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीने सोन्याची चैन असलेला रूमाल हातात घेतला व तुमच्या पिशवीत ठेवतो असे सांगितले. त्यानंतर ते तिन्ही व्यक्ती एका मोटार सायकलवरून पुढे निघून गेले. नंतर फडतरे यांनी पिशवी उघडून पाहिले असता सदर पिशवीमध्ये रूमाल व सोन्याची चैन त्यांना दिसून आली नाही. त्यावरून फडतरे यांच्या लक्षात आले की तिन्ही व्यक्तींनी हाताचलाखी करून सोन्याची चैन फसवून चोरून घेवून गेले आहेत. त्यानंतर फडतरे यांनी त्या तिन्ही व्यक्तींचा फलटण शहरात डीएड चौक, डेक्कन चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, एस. टी स्टॅण्ड तसेच फलटण शहर परिसरात शोध घेतला असता ते तीन व्यक्ती कोठेही आढळून आले नाहीत. यानंतर फिर्यादी दत्तराज शिवाजीराव फडतरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.