केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हासंबंधी दिलेल्या दोषपुर्ण निर्णयाविरोधात मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना व शिवसेना अंगीकृत सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार - खासदारांना मिळालेल्या मतांवर निकष लावून शिंदे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह बहाल केले. प्रत्यक्षात मात्र प्रामुख्याने सदस्य नोंदणी फाॅर्म व प्रतिज्ञापत्र जमा करण्यासाठी ठाकरे व शिंदे गटास आदेश दिले होते. जवळपास मागील सहा महिन्यांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन, पदरमोड करुन लाखोंच्या घरात सदस्य नोंदणी फाॅर्म व प्रतिज्ञापत्र जमा केले होते.
खरेतर निवडणूक आयोगाने त्यावर निर्णय देणं अपेक्षित होती. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जनतेची देखील हीच अपेक्षा होती. परंतु निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत शिंदे गटाच्या बाजुने व चुकीचा निर्णय दिला असल्याची प्रतिक्रिया संपुर्ण महाराष्ट्रासह भारतभर उमटत आहे. निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाहीची एकप्रकारे हत्याच केली आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याचे आवाहनही नागरिकांना यावेळी करण्यात आले.
निषेध आंदोलनावेळी निवडणूक आयोगाने दिलेल्या दोषपूर्ण निर्णयाविरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच काही झाले तरी महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहणार असल्याचे सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी ठामपणे सांगितले.