फलटण प्रतिनिधी -
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
19 फेब्रुवारी 2026 रोजी येणारा वाढदिवस कोणत्याही प्रकारे साजरा करण्यात येऊ नये, असे त्यांनी सहकारी कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना आवाहन केले आहे. तसेच कौटुंबिक कारणास्तव त्या दिवशी ते बाहेरगावी असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे वाढदिवसाचे कार्यक्रम, शुभेच्छा फलक, बॅनर किंवा सत्कार समारंभ आयोजित करू नयेत, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.
स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून, या दुःखद प्रसंगी सर्वांनी दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचा आदर्श जपावा, असेही नाईक निंबाळकर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.











