सातारा बसस्थानकात झोपलेल्या युवकाचा गारठून मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, तो आजारी असल्याचेही समोर आले आहे.
सातारा : सातारा बसस्थानकात झोपलेल्या युवकाचा गारठून मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, तो आजारी असल्याचेही समोर आले आहे.
ब्रिजमोहन भूतनाथ यादव (वय २५, रा. छत्तीसगड, मध्यप्रदेश) असे गारठून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ब्रिजमोहन यादव हा गोव्यातील एका हाॅटेलमध्ये काम करत होता. तो आजारी असल्याने तो छत्तीसगडला निघाला होता. सातारा बसस्थानकामध्ये सोमवारी रात्री तो आला. पुढे जाण्यासाठी बस नसल्याने तो रात्री एकच्या सुमारास बसस्थानकातील फलाट क्रमांक पाचवर झोपला. यावेळी बसस्थानकातील पोलिसांनी त्याच्याकडे चाैकशीही केली. त्यावेळी त्याने सकाळी बसने गावी जाणार आहे, असे त्यांना सांगितले. त्यानंतर तो झोपी गेला. परंतु सकाळी आठ वाजले तरी ब्रिजमोहन यादव झोपेतून उठला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या अंगावरील चादर काढली असता त्याची हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून ब्रिजमोहन यादवला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यानंतर त्याचा गारठून मृत्यू झाला असल्याचे समोर आले.