खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत फलटण व मलटण मधील रस्ते व इतर सुविधांकरिता सात कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा, नातेपुते, माळशिरस, म्हसवड, माढा, महाळुंग, या नगरपंचायत व नगरपरिषद यांना तीन कोटी रुपये असा निधी मंजूर केला आहे. यामुळे या मतदारसंघांमध्ये विकास कामाला चालना मिळणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. फलटण शहरांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी फलटण शहराच्या विकासासाठी काही काम केले नाही त्यामुळे सामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादी च्या बाबत नाराजी व्यक्त करत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विविध पद्धतीने निधी उपलब्ध करून या शहराच्या विकासासाठी काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी या शहराच्या विकासासाठी यापूर्वीच पालखी महामार्ग अंतर्गत १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही कामे लवकरच वेळ सुरू होतील.
राज्य शासनाने फलटण शहराच्या विकासासाठी नगरपरिषद क्षेत्रातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे दहाव्याच्या विधीसाठी दत्त घाट, मंदिराला कंपाऊंड, लोहार समाजासाठी सभा मंडप, समाज मंदिर, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन ,बेलदार समाजासाठी सभागृह , मारवाड पेठे मध्ये अभ्यासिका, लिंगायत स्मशान समाजासाठी स्मशानभूमीस कंपाउंड, वीर जीवा महाले स्मारक चौथरा, गटर लाईन, काँक्रिटीकरण करणे, आनंदनगर येथे ओपन स्पेस मध्ये नाना- नानी पार्क, सामाजिक सभागृहा बांधणे, चांदतारा मुस्लिम मज्जित मध्ये सभागृह बांधणे, खाटीक गल्लीत सभा मंडप बांधणे, शिवाजीनगर येथे व्यायाम शाळा बांधणे , वडार समाजासाठी समाज मंदिर बांधणे, मळजाई मंदिर समोर ओपन स्पेस मध्ये बगीचा तयार करणे, श्री ग्राहक बाजार शेजारी ओपन स्पेस मध्ये बगीचा तयार करणे, धनलक्ष्मी अपारमेंट शेजारील ओपन स्पेस मध्ये सामाजिक सभागृहा बांधणे, संजीवराजे नगर मध्ये ओपन स्पेस मध्ये नाना - नानी पार्क बांधणे, माणकेश्वर मंदिरा शेजारी सुशोभीकरण करणे, शंकर मार्केट सुशोभीकरण करणे, जैन मंदिर मागे वडार वस्ती मध्ये समाज मंदिर बांधणे अशा अनेक कामांकरिता ही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे शहरातील रस्ते व इतर बाबी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत व शहराच्या विकासासाठी यामुळे नक्कीच चालना मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे फलटणकरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.