फलटण प्रतिनिधी:- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरुन नेल्याच्या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ फलटण ता. फलटण जि.सातारा येथील शुक्रवार पेठ ते मलटण जाणारे रोडवर बाणगंगा नदीचे पुलावरुन फिर्यादी उज्वला दिलीप कदम (रा.अक्षत रेसिडन्सी जाधववाडी ता. फलटण) या जाधववाडीकडे जाणेसाठी त्याच्या सूने बरोबर मोटामायकलवरून जात असताना अचानक शुक्रवार पेठेकडुन मलटणकडे जाणारी एक काळ्या रंगाची मोटारसायकल वर आलेल्या दोन अनोळखी व्यक्ती पैकी गाडी चालवण्या-या व्यक्तीने पत्ता विचारण्याचा बहाणा करून फिर्यादी यांच्या मोटारसायकल जवळ येवुन अचानक गाडी थांबवली व त्याचवेळी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या गळ्यावर जोरात हात मारून गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे काळ्यापिवळ्या मण्यात गुंफलेले कडेने सोन्याची चैन असलेले तसेच मध्ये पदक असलेले 2 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगलमुत्र जबरदस्तीने हिसकावुन नेहले. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यातील पोलिस अधिक तपास करत आहेत.