राज्यात पेट्रोलच्या करात 5 रुपये आणि डिझेलच्या करात 3 रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत लोकहिताचे अनेक निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील नागरिकांना आज मध्यरात्री 12 वाजेपासूनच पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त मिळेल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
- सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार
- 18 ते 59 वयापर्यंतच्या नागरिकांना मोफत बुस्टर डोस
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना योजनेतून वगळणार नाही
- राज्यात 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान' राबवणार
- बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देणार. त्यासाठी महाराष्ट्र कृषी
- उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करणार
- आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेंशन देणार. 31 जुलै, 2020 रोजी ही योजना बंद करण्यात आली होती.
राज्यात पूरस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मंत्री-राज्यमंत्री नाहीत. तसेच आपत्तीग्रस्त 36 जिल्हेही पालकमंत्र्यांविना ‘पोरके’ आहेत. यावर प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. पूरस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून लोकांना मदत करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्यास नकार
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करणार यावर भाष्य करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. त्यामुळे इतर विषयांवर बोलणार नाही , मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करु असे सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.