दि. 13 ऑक्टोबर रोजी गुरुवार पेठेत चोरी झाल्याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे राणीहार व सोन्याचे गंठण लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
सातारा : सातारा शहरात गुरुवार पेठेतील घरातून चोरी झालेल्या सोन्यावर मैत्रिणीनेच डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) छडा लावला असता संशयित महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाली. दरम्यान, चोरीतील 1 लाख 80 हजार रुपयांचे चोरीचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 13 ऑक्टोबर रोजी गुरुवार पेठेत चोरी झाल्याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे राणीहार व सोन्याचे गंठण लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले होते. डीबीच्या पथकाने याचा तपास सुरु केल्यानंतर घरामध्ये कोणाचे येणे-जाणे असते यावर भर दिल्यानंतर सीमा कोकरे (वय 40, रा.केसरकर पेठ) या महिलेचे नाव समोर आले. पोलिसांनी या महिलेकडे चौकशीला सुरुवात केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली.
सातारा शहर पोलिसांनी संबंधित महिलेबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. संशयित महिलेवर यापूर्वी मुंबई, सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलेकडून सोन्याचा सर्व ऐवज जप्त केला. या कारवाईनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली.
डीबीचे फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, जोतीराम पवार, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.