श्रीराम बझारची गेली अनेक वर्षापासून शासकीय हिशोब तपासणी झाली नाही, ती तात्काळ करून घ्यावी अशी मागणी संचालक राजाराम फणसे यांनी श्रीराम बझारच्या वार्षिक सभेत केल्यावर ती मंजूर करून इतर अनेक विषयावर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था लि.फलटण जिल्हा सातारा संचालित ' श्रीराम बाझार ' या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, संस्थेच्या सभासदांनी १० विषयांच्या ठरवास मान्यता व अनुमोदन देऊन संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन जितेंद्र पवार होते. श्रीराम बझारचे सभासद यांनी विविध विषय मांडले त्यामध्ये प्रामुख्याने मागील काही वर्षांमध्ये अधिकाऱ्यांनी जो दोन कोटी चार लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला होता, याबाबत सहकार न्यायालयात न्याय मिळण्यास उशीर लागत असल्याचे लक्षात आणून दिल्यावर, संचालक राजाराम फणसे यांनी, मागील १० वर्षाचे शासकीय ऑडिट करून संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. श्रीराम बझार मध्ये मालाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकचा जास्त उपयोग होतो यावर पर्यावरण पूरक अशी पर्यायी व्यवस्थेची सूचना सभासदांनी केली. ठेवी वरील व्याजदर आणि परचेस रिबिट वाढवून मिळण्याबाबत सभासदांनी मागणी केली. यावेळी आर्थिक गैरव्यवहाराबाबत संबंधीत अधिकारी यांच्यावरती कार्यवाही केली असून हे प्रकरण सहकार न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे. तरीसुद्धा शासकीय हिशोब तपासणी करून घेण्यासाठी प्रयत्न करू असे चेअरमन जितेंद्र पवार यांनी सांगितले. या सभेस माजी चेअरमन महादेव पवार, संचालक रविंद्र बेडकिहाळ, राजाराम फणसे, मारुती गावडे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सभेसाठी संचालक तेजसिंह भोसले, तुषारकाका गांधी, बापूराव गावडे सुभाष कर्णे, आनंदराव शिंदे, नितीन भोसले, अनिल रणवरे, चंद्रकांत शिंदे, प्रभावती गरूड व शितल अहिवळे हे उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रस्तावना व अहवाल वाचन श्रीराम बझारचे जनरल मॅनेजर अनंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक आनंद बेलदार यांनी केले.