जिजामातानगर, ता. कराड येथील प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचे हे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केले. यामध्ये सर्व इयत्तांचे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. सदर, कार्यशाळेत बनवलेले आकाशकंदील शाळेत जमा करण्यात आले.
कराड : जिजामातानगर, ता. कराड येथील प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचे हे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केले. यामध्ये सर्व इयत्तांचे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. सदर, कार्यशाळेत बनवलेले आकाशकंदील शाळेत जमा करण्यात आले.
यावेळी शाळेच्या परिसरातील काही कुटूंबात या आकाशदिव्यांचे वाटप करण्यात आले. हे दिवे संपूर्ण कागदी असल्याने ते पर्यावरणपूरक आहेत. दिवसेंदिवस प्लास्टिक दिवे बाजारात येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे पर्यावरण चांगले राहावे; याचे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना महत्व समजावे. यासाठी शाळेत दरवर्षी असे दिवे तयार करून शालेय परिसरात वाटले जातात.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, उपशिक्षिका मंजुषा माने व स्मिता यादव यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हे दिवे परिसरात वितरित करण्यात आले. या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.