जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी ८ रोजी कराडात मॅरेथॉन दौरा केला. त्यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने तिघांशीही राजकीय चर्चा केली.
कराड : जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी ८ रोजी कराडात मॅरेथॉन दौरा केला. त्यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने तिघांशीही राजकीय चर्चा केली.
खा. उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शरद काटकर, इंद्रजीत चव्हाण उपस्थित होते.
त्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी कराड सोसायटी मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे दोन तास कमराबंद चर्चा केली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी येथील खरेदी विक्री संघाच्या मुख्य कार्यालयात ही भेट झाली. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या सोबत शरद काटकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हणमंतराव पवार उपस्थित होते.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील-उंडाळकर या दोघांनीही सोसायटी गटातून अर्ज भरले आहेत. तर गृहनिर्माणमधून सहकारमंत्री यांचे बंधू जयंत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून याच मतदार संघातून छ. उदयनराजे भोसले यांचाही अर्ज असल्याने या भेटीला मोठे महत्व आहे.
दरम्यान, त्यांनी डॉ. अतुल भोसले यांचीही भेट घेऊन जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने ओघवती चर्चाही केल्याचे समजते. त्यामुळे उदयनराजे भोसले यांनी कराडातील मॅरेथॉन दौऱ्यामध्ये माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, अँड. उदयसिंह पाटील, डॉ. अतुल भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.
सहकारमहर्षी आदरणीय जयवंतराव भोसले यांच्या पत्नी व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री कै. जयमाला जयवंतराव भोसले यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. कराड दौऱ्यावेळी सोमवारी मलकापूर येथे खा. उदयनराजे भोसले यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन कै. जयमाला भोसले यांना आदरांजली वाहिली व कुटुंबियांचे सांत्वन केले.