सातारा दि. 16 : सातारा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदींसाठी जिल्हा रुग्णालयांमार्फत त्वचारोग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये बंदींवर त्वचेसंबंधातील असलेल्या आजारांवर उपचार करण्यात आले.
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय येथील त्वचारोग तज्ञ डॉ. सुधीर बक्षी व गुप्तरोग समुपदेशक सचिन जाधव यांनी या शिबिरामध्ये कारागृहातील बंदींची तपासणी करून त्वचेसंबंधातील समस्यांचे उपचार केले. वैयक्तिक स्वच्छता व त्वचेची काळजी घेण्याबाबत तसेच समुपदेशनाद्वारे त्यांच्या शंकांचे निवारण करण्यात आले. या त्वचारोग शिबिरामध्ये कारागृहातील एकूण 27 बंद्यांची तपासणी करण्यात आली. कारागृहातील बंदींच्या विविध आजारांवर उपचार करण्याकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ हा नेहमीच तत्पर असतो. त्यामुळे कारागृहातील बंदींच्या आजारांवर नेहमीच वेळेवर उपचार होतात. या आरोग्य शिबिरास डॉ. सुधीर बक्षी, समुपदेशक सचिन जाधव, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे,वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, शिपाई हेमंत सुपेकर, रंजीत बर्गे व इतर कर्मचारी उपस्थित होते.