फलटण प्रतिनिधी -
ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे ९वे वर्ष असून, जागतिक मराठी दिनानिमित्त शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण येथे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून राज्यातील एकमेव सातत्याने आयोजित होणारे हे साहित्य संमेलन असून, राज्यभरातील शेकडो साहित्यिकांचा यामध्ये सन्मान करण्यात आला आहे. नवोदित कवी व साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच वाचन-लेखनाची गोडी वाढावी या उदात्त हेतूने संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त इयत्ता ३री ते १२वी तसेच खुल्या गटासाठी निबंध लेखन स्पर्धाही घेण्यात आली होती.
ऐतिहासिकदृष्ट्या साहित्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटणमध्ये कै. श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर तसेच कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या साहित्यसेवेची परंपरा पुढे नेण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून सलग आठ वर्षांपासून सुरू आहे.
यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी सासवड (ता. फलटण) येथील प्रसिद्ध लेखक, समीक्षक व गझलकार श्री विजय काकडे यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी प्रा. महादेव गुंजवटे यांची निवड झाली आहे.
यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक श्री अरविंद शांतीलाल मेहता व सौ. इंदूबेन अरविंद मेहता यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार श्रीमती आशाताई ज्ञानेश्वर दळवी (दुधेबावी) व श्रीमती कमल चंद्रकांत मोरे (सोनवडी) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संमेलनानिमित्त विविध साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट कवितासंग्रह, गझल, कथासंग्रह, कादंबरी, ललित, संशोधन, बालसाहित्य, दिवाळी अंक, प्रवासवर्णन व चरित्रग्रंथ या विभागांतील साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय विशेष साहित्य सन्मानही जाहीर करण्यात आला आहे.
निबंध स्पर्धेत लहान गट, माध्यमिक गट आणि खुल्या गटातील विजेत्यांची निवड करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.
सर्व पुरस्कारांचे वितरण २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संमेलनात सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे. या संमेलनात साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन साहित्यिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते व निमंत्रक ज्ञानेश्वर देशमुख यांनी केले आहे.











