फलटण प्रतिनिधी : फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे पुनर्रचनेनंतर अनुसूचित जाती करता हा मतदार संघ राखीव झाल्यापासून गेल्या 15 वर्षात ( सलग तीन विधानसभा निवडणूक ) आंबेडकरी समाजाला विधानसभेत संधी मिळाली नाही. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणूकित आंबेडकरी समाजातीलच उमेदवार विधानसभेत पाठवण्यासाठी आंबेडकरी समाजाने वज्रमुठ बांधली आहे. यासंबंधि विचार - विनिमय करण्यासाठी आज फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली होती.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती मधील सर्वाधिक मतदार हा बौद्ध समाजाचा असल्याने त्यांना स्थानिक नेतृत्वाने ( सत्ताधारी व विरोधक ) अग्रक्रमाणे संधी द्यावी ही प्रमुख मागणी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. आरक्षणामधील अन्य जाती घटकापेक्षा मतदार संख्या सर्वाधिक बौद्धाची असल्यामुळे अशी मागणी पुढे येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सदरची मागणी सत्त्यात उतरण्यासाठी शहरातील प्रमुख मंडळी पुढे येऊन त्यांनी हा राजकीय मांडणी केली आहे.
फलटण शहर व ग्रामीण भागातील जनतेची संवाद साधण्यासाठी आगामी काही दिवसात फलटणमध्ये बौद्ध समाजाचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. प्रमुख पक्षांना यावेळी उमेदवारी देण्याचा आग्रह करण्यात आला. उमेदवारी न दिल्यास स्वतंत्रपणे लढण्याचा विचारही या बैठकीत अनेकांनी मांडला.
माजी नगरसेवक, विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, समाजातील प्रमुख मान्यवर यांच्या सह ग्रामीण भागातील प्रमुख मान्यवर उपास्थित होते.