पुढील प्रवेश कोणाचा तालुक्यात चर्चेला उधाण :ओबीसी नेते माणिकराव सोनवलकर, जेष्ठ नेते विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे संदीप चोरमले, यांनी राजे गटाला सोडचिट्टी देत भाजपा पक्षाची वाट धरली आहे. त्यामुळे आता फलटण तालुक्यातील पुढील प्रवेश कोणाचा? अशी चर्चा सध्या फलटण तालुक्यात रंगू लागली आहे.
फलटण प्रतिनिधी -
विधानसभेची निवडणूक लवकरच येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. त्यात फलटण तालुका ही मागे राहिला नाही. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाचे विश्वासू सहकारी व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ओबीसी नेते माणिकराव सोनवलकर यांनी राजे गटाला सोडचिट्टी देत भाजपामध्ये नुकताच प्रवेश केला आहे. ओबीसी समाजाचे नेते माणिकराव सोनवलकर यांच्या भाजपा प्रवेशाने तालुक्यात चर्चांना उधाण आले असून राजे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आघाडी घेत राजे गटाला धक्का दिला होता. तर जेष्ठनेते विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, संदीप चोरमले यांनी राजे गटाला राम - राम ठोकत माजी खासदार रणजितसिंह यांच्या वर विश्वास ठेवत भाजपाची वाट धरली आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणे सुरू केली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील अनेक मातब्बर नेते सध्या भाजपच्या रेंजमध्ये असल्याचे बोलले जात आहे. तर तालुक्यातील भाजपामध्ये पुढील प्रवेश कोणाचा? अशी चर्चा सध्या फलटण तालुक्यात रंगू लागली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. ही बाब रामराजे यांना जिव्हारी लागल्याने त्यांनी आसू येथे सभा घेत शिवरूपराजे यांच्यावर घणाघाती टिका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवरूपराजे यांनीही सभेचे आयोजन केले असून ये या सभेत काय बोलणार याकडे फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.