फलटण प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.गणेश नाईक यांनी प्रत्येक जिल्हयात वनसेवा केंद्र सुरू करण्याच्या सुचना सर्व वनअधिकारी यांना दिल्या आहेत. त्यानुसार सातारा वनविभागाचे मा. उपवसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक दिंगबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या सेवा गावपातळीवर पोहोचण्यासाठी फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र फलटण व वनसेवा केंद्र आदर्की असे दोन वनसेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत अशी माहिती एका प्रसिध्दपत्रकाद्वारे फलटणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर यांनी कळविले आहे.
प्रसिध्दपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत वनविभागाच्या १३ सेवा नागरिकांना दिल्या जातात त्यात प्रामुख्याने वन्यप्राण्यांकडून होणारी पशू नुकसान भरपाई, वन्यप्राण्यांमुळ होणारी पीक नुकसान भरपाई, वनेत्तर क्षेत्रातील (मालकी) वृक्षतोड, वनेत्तर जमींनीचे ना हरकत प्रमाणपत्र इ. सेवांचा समावेश आहे. या सेवा बाबत माहिती देवून परिपूर्ण प्रस्ताव या वनकेंद्रात स्विकारले जातील.
नागरिकांना जलद गतीने सेवा मिळणार असून गतिमान प्रशासन या दृष्टीने सदर वनसेवा केंद्र एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. तरी फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी वनविभागाच्या सेवा उपभोगण्यासाठी वनसेवा केंद्र आदर्की व वनसेवा केंद्र गिरवी नाका फलटण येथे भेट द्यावी असे आवाहन फलटणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर यांनी केले आहे.










