फलटण (प्रतिनिधी) –
कोळकीमध्ये सध्या मच्छरांचा (डासांचा) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डासांमुळे ताप, व्हायरल तसेच डेंगूसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने रुग्णांची संख्या देखील वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गावात तातडीने फॉगिंग मशीनद्वारे औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रशासनाने तणनाशक फवारणी करून तात्पुरती कारवाई केली होती. मात्र त्याने मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. डेंगूसारख्या गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच तातडीने फॉगिंग फवारणी करून उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.सध्या परिस्थिती अशी आहे की जनता हैराण झाली असून मच्छर आणि प्रशासन मात्र सुसाट असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.












