नागपंचमी सण साजरा होऊन तब्ब्ल 8 दिवस झाले तरीही फलटणमध्ये चायनीज मांजाचा वापर सुरूच आहे.
फलटण , 18 ऑगस्ट : नागपंचमी सणानिमित्त महाराष्ट्रातील गावोगावी पतंग उडवले जातात. यासाठी मांजाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पतंग उडवण्यासाठी लागणारा चायनीज नायलॉन मांजा हा एकाच्या जीवावर बेतला आहे. फलटण मधील अधिकारगृह परिसरात येथे दुचाकीवरून चाललेल्या एका व्यक्तीला चायनीज मांजा मुळे गंभीर दुखापत झाली आहे. संतोष जाधव असे या जखमी झालेल्याचे नाव आहे. या घटनेत त्यांच्या तोंडावर व मानेवर गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने फलटण येथील वाघमारे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा चायनीज मांजा फलटणमध्ये मांजा विक्रेत्यांकडून सुद्धा विक्री केला जात आहे. अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासन व नगरपालिका यांना चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी असे आवाहन केले होते. तरी देखील पोलीस प्रशासनकडून चायनीज मांजा विक्रेत्यांवर जाणून-बुजून दुर्लक्ष केले असल्याचे समजले जाते. पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्यांना अगोदरच ताब्यात घेऊन कारवाई करणे आवश्यक होते. परंतु पोलीस प्रशासनाने तसे केले नाही.
त्यामुळे एकाला गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. सदर घडलेल्या घटनेला जबाबदार कोण? असे लोकांकडून विचारले जात आहे. तसेच बंदी असूनही चायनीज मांजा विकला कसा जातो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून सध्या संताप व्यक्त केला जात आहे.