फलटण प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यावेळी फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेच्या अध्यक्षपदी राजुरी ता. फलटण येथील जयकुमार इंगळे तर फलटण शहराध्यक्षपदी प्रमोद निंबाळकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष गेनूजी कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
फलटण तालुका अध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी यापूर्वीही फलटण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे. तर राजुरी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द केली आहे. फलटण तालुक्यामध्ये जयकुमार इंगळे यांचा दांडगा जनसंपर्क असून युवक संघटनांमध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.
फलटण शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर हे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे फलटण सेंटरचे संस्थापक आहेत. या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष काम केले आहे. व्यापारी वर्गामध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांचे वडील कै. सुभाषराव निंबाळकर हे फलटण नगर परिषदेचे नगरसेवक होते. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय म्हणून कै. सुभाषराव निंबाळकर सुपरिचित होते. राजकीय बाळकडू घरातूनच मिळाल्याने प्रमोद निंबाळकर फलटण शहराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी करतील असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
जयकुमार इंगळे व प्रमोद निंबाळकर यांच्या निवडीबद्दल आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.