सुर्ली, ता. कराड येथील घाटात आटपाडी-कराड बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी कर्मचाऱ्यांनी सदर बस तक्रार देण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली होती. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कराड : सुर्ली, ता. कराड येथील घाटात आटपाडी-कराड बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी कर्मचाऱ्यांनी सदर बस तक्रार देण्यासाठी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणली होती. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारातून निघालेली बस (क्र. एमएच -14- बीटी- 3695) कडेगाव येथून पुढे आल्यानंतर सुर्ली घाटात बसवर दगडफेक झाली आहे. बस कराडकडे येत असताना पाठिमागून बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची माहिती वाहक अमोल वाघमारे यांनी दिली. या दगडफेकीत बसमधील कोणत्याही प्रवाशास दुखापत झालेली नाही.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. तरीही कामावर रुजू न होणाऱ्या संपकऱ्यांवर महामंडळाने निलंबनासह सेवासमाप्तीची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाल्याने काही बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सातारा व सांगली जिल्ह्यातील काही बसेस सुरू झाल्या आहेत.
यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारतही काही बसेस सुरू झाल्या असून आटपाडी आगारातून कराडकडे येणाऱ्या एसटी बसवर दगडफेक केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.