फलटण प्रतिनिधी – भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारवंत आणि दलित, वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने फलटण येथे अभिवादन करण्यात आले. संविधान, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना पुन्हा अधोरेखित करत भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी जेष्ठ नेते विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, सतीश अहिवळे, तेजस काकडे आणि रिपाईचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जेष्ठ नेते विजय येवले म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळाला आहे. त्यांच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे.”
संजय निकाळजे यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक सुधारणा, शिक्षणावरचा भर आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती देताना “लोकशाही टिकून राहणार असेल तर बाबासाहेबांचे विचार जनमानसात रुजणे आवश्यक आहे,” असे सांगितले.



















