वारुंजी फाटा, ता. कराड येथे बेकरीला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये रोख रक्कम, खाऊचे पदार्थ व फर्निचर असे सुमारे 7 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कराड : वारुंजी फाटा, ता. कराड येथे बेकरीला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये रोख रक्कम, खाऊचे पदार्थ व फर्निचर असे सुमारे 7 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूरमध्ये राहणार्या पारशीदेवी सुखदेवराम विष्णोई यांच्या मालकीचे अंबिका स्वीट्स नावाचे मिठाईचे दुकान वारुंजी फाटा येथे गणपती मंदिराजवळ आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री 10 वाजता मिठाईचे दुकान बंद करून त्या घरी गेल्या. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या शेजारी राहणारे हर्षद सलीम नदाफ यांनी पारशीदेवी विष्णोई यांना फोन करून तुमच्या दुकानाला आग लागली असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्या पती व मुलासह घटनास्थळी आल्या. त्यावेळी परिसरातील लोक दुकानाला लागलेली आग पाणी टाकून विझवत होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर विष्णोई यांनी 101 नंबर वर फोन करून आगीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही. तोपर्यंत लोकांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली होती. या आगीमध्ये विष्णोई यांचे रोख तीस हजार रुपये, तसेच तीन लाख रुपयांचे खाऊचे पदार्थ व साडेचार लाख रुपयांचे दुकानातील फर्निचर असे एकूण सात लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार फडतरे करत आहेत.