फलटण प्रतिनिधी —
पिंपरद (ता. फलटण) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी–पंढरपूर मार्गावरील उड्डाणपुलाखाली पडलेले महाकाय खड्डे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. “लोक खड्ड्यात पडून मेल्यावरच हे खड्डे भरणार आहात का?” असा जळजळीत सवाल संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असताना, त्याखालील रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या आळंदी–पंढरपूर रस्त्याच्या कामामुळे पिंपरद व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठा त्रास सहन केला. विकासासाठीचा त्रास म्हणून तो सहनही केला; मात्र आता उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही त्याखाली पडलेले खोल खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. हे खड्डे नेमके कोणी भरायचे—हायवेची एजन्सी की स्थानिक प्रशासन—याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. या गोंधळात दररोज ये-जा करणारे पिंपरद, राजाळे, निंबळक व इतर गावांतील नागरिक अपघाताच्या धोक्यात ढकलले जात आहेत.
रात्रीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच भयावह होते. दुचाकीस्वार, चारचाकी चालक, शेतकरी, विद्यार्थी—सगळेच या खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अपघात होऊन जीव गेला तर जबाबदारी कोण घेणार? प्रशासनाने गेंड्याच्या कातड्याचे पांघरूण घेतले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वारंवार तक्रारी करूनही कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येणाऱ्या २६ जानेवारी रोजी आळंदी–पंढरपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खड्डे तातडीने न भरल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
“विकासाच्या नावाखाली लोकांचे जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कुणालाही नाही. अपघात घडण्याआधीच प्रशासनाने जागे होऊन उड्डाणपुलाखालचे खड्डे तात्काळ भरावेत,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की पुन्हा एखाद्या दुर्दैवी घटनेची वाट पाहणार—हा प्रश्न पिंपरदकरांना सतावत आहे.











