फलटण प्रतिनिधी :
फलटण नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून प्रसाद पवार पाटील यांच्या आई श्रीमती नर्मदा किसनराव पवार - पाटील तसेच बंधू देवीदास (देवा अण्णा) पवार - पाटील यांनी प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवली होती. मात्र यांचा पराभव झाला असला, तरी हा पराभव आम्हाला खचवणारा नाही, असे स्पष्ट मत प्रसाद पवार पाटील यांनी व्यक्त केले आहे.
“नगरपालिकेचा विजय खेचून आणू शकलो नाही, मात्र खचलोही नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी धैर्य टाईम्सशी बोलताना आपली भूमिका मांडली. निवडणूक लढवताना स्वतःच्या हिमतीवर व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही मैदानात उतरलो होतो. मात्र आमच्याच गटातील काही गद्दारांच्या गद्दारीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले, असा आरोप त्यांनी केला.
पराभव स्वीकारला, पण हार मानलेली नाही
एका पराभवामुळे प्रसाद पवार - पाटील खचणारे नाहीत, हे त्यांनी ठामपणे सांगितले. “हा पराभव माझ्या राजकीय प्रवासाचा शेवट नसून, तो नव्या उमेदीने उभे राहण्याचा टप्पा आहे. पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी, अधिक जोमाने काम करणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नेतृत्वावर विश्वास कायम
आपल्या पराभवाबाबत कोणावरही नाराजी नसल्याचे सांगत, “आजही आम्ही आमचे नेते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशाप्रमाणेच काम करत आहोत. पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ असून, भविष्यातही पक्षासाठी निष्ठेने कार्यरत राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
संघर्ष सुरूच राहणार
“मी खचलो नाही, आणि कधीच खचणार नाही. सातत्याने पक्षाच्या आणि जनतेच्या हितासाठी काम करत राहीन,” असे सांगत प्रसाद पवार पाटील यांनी आपल्या राजकीय संघर्षाची दिशा स्पष्ट केली.
नगरपालिका निवडणुकीतील पराभव असला, तरी कार्यकर्त्यांशी असलेली नाळ, पक्षनिष्ठा आणि पुढील लढतीसाठीची तयारी यामुळे प्रसाद पवार पाटील पुन्हा सक्रिय राजकारणात दिसणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.











