फलटण प्रतिनिधी –
कोळकी गावात राजे गटाला मोठा धक्का बसला असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कोळकी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य अक्षय गायकवाड यांचे बंधू, कोळकी गावचे युवा नेते श्री. अनुप शामराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनुप गायकवाड यांनी राजे गटात कामाला कोणतेही महत्त्व दिले जात नसल्याने तसेच सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांची वारंवार कुचंबणा होत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. यापुढे महायुतीचे प्रमुख माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी अनुप गायकवाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर स्वागत करत, पक्षात त्यांना सन्मानजनक स्थान देण्यात येईल व त्यांच्या कार्यकर्तृत्वाला योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या पक्षप्रवेशामुळे कोळकीसह परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून राजे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.


















