ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करीत ग्रामस्थांना मौलिक सूचना केल्या.
कराड : सुमारे 10 ते 12 दिवसापासून नांदगाव (ता.कराड) येथे बिबट्याची दहशत सुरू आहे. पशुधन धोक्यात आहेच पण त्याच बरोबर बिबट्या मनुष्य प्राण्यावर हल्ला करणार नाही ना? अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. कारण बिबट्या फक्त शिवारातच नव्हे तर लोकांच्या दारात फिरू लागला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करीत ग्रामस्थांना मौलिक सूचना केल्या.
सुळागिरी च्या कुशीत वसलेल्या नांदगाव येथे 6 ऑक्टोंबर रोजी बिबट्याने शेळी व बोकड यावर हल्ला करीत त्यांना ठार केले. लोकवस्ती असणाऱ्या भागात झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला. पण त्यानंतर हा बिबट्या दररोज ग्रामस्थांना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. तर लोकवस्तीत रात्रीचा बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थ सायंकाळपासूनच घराची दारे बंद करून घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री वनरक्षक अरुण सोळंकी, वनपाल आनंदा सवाखंडे, धनाजी गावडे यांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. कुंभारवाडा येथील बाग नावाच्या शिवारातून बिबट्या येत असल्याने तेथे जाऊन पायांचे ठसे पाहिले. बिबट्या पासून कशी सावधानता बाळगावी याबाबत ग्रामस्थांना सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, पत्रकार प्रमोद सुकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हितेश सूर्वे, रघुनाथ जाधव, सचिन कुंभार, विलास कुंभार, रोहन पाटील, सौरभ पाटील, अण्णा शेटके, निलेश कुंभार, गणपत पवार आदींची उपस्थिती होती.
रविवारी रात्रीही बिबट्याचे दर्शन
रविवार (दि.17) रोजी रात्री आठच्या सुमारास नांदगाव पोलीस औटपोस्ट च्या पाठीमागच्या बाजूला रस्ता पार करीत उसाच्या शेतात जाताना ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिले. त्यामुळे ग्रामस्थांमधील भीती वाढतच चालली आहे.