सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. मात्र, कोरोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नसून नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. शिवाय, मास्कचाही वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवत असल्याने नगरपालिकेकडून शहरातील बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्ते सॅनिटायझ करून घेण्यात येत आहेत.
कराड : सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. मात्र, कोरोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नसून नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. शिवाय, मास्कचाही वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवत असल्याने नगरपालिकेकडून शहरातील बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्ते सॅनिटायझ करून घेण्यात येत आहेत.
येथील नगरपालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच फटाके उडविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. नागरिक विविध कार्यक्रम, सण साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर करतात. फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घातले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील बाजारपेठेत लोकांची खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता विशेष खबरदारी देण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकाकडून शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवर सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे.
गत वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनसह अनेक निर्बंध घातले होते. त्यामुळे लोकांना दिवाळी सण साजरा करता आला नव्हता. तसेच त्यानिमित्त विविध प्रकारची खरेदीही करता आली नव्हती. मात्र, सध्या कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळे शासनाने बहुतांशी निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे या वर्षी दिवाळीच्या खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. परंतु, कोरोना पूर्णपणे गेलेला नसून नागरिक बिनधास्तपणे वावरताना दिसून येत आहेत. यासाठी पालिकेकडून खबरदारी म्हणून बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्ते सॅनिटायझ करण्यात येत आहेत.


















