फलटण प्रतिनिधी -
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून फलटण शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8. वाजता फलटण शहरातील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी फलटण - कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी या मोहिमेत सहभागी होत हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे, फलटण दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती खेडकर - गोयल मॅडम, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंशुमन धुमाळ आणि सर्व शासकीय कार्यालयातील सर्व शासकीय कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पा साहेब धर्माधिकारी व डॉ श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या शहर स्वच्छता अभियानामध्ये फलटण पंचायत समिती कार्यालय परिसर, प्रांत कार्यालय परिसर, तहसील कार्यालय परिसर, नवीन न्यायालय इमारत परिसर व उपजिल्हा रुग्णालय इमारत परिसर इत्यादी भागात स्वच्छता करण्यात येणार आली. या स्वच्छता अभियान कार्यक्रमात फलटण तालुक्यातील श्रीसमर्थ बैठक मधील जवळपास 700 ते 800 श्री सदस्य सहभागी झाले होते. त्याचबरोबर नातेपुते, वाठार - स्टेशन, लोणंद, निरा, धर्मपुरी, येथील श्री सदस्यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. या अभियानात 25 टन ओला व सुका कचरा संकलन करून फलटण नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वरती पोहोच करण्यात आला.
या शहर स्वच्छता अभियानामध्ये फलटण शहरासोबत महाराष्ट्रातील तसेच देशात व परदेशात देखील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.