शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती व शेतीपूरक उद्योग देशातील 55 टक्के रोजगार प्रदान करते, ज्यापैकी मोठया संख्येने महिला या क्षेत्रात काम करतात. कृषीक्षेत्रामध्ये महिला व पुरुष दोघांचे ही योगदान महत्वाचे आहे. तथापी ग्रामीण महिलांचे शेतातील कामाचे प्रमाण हे सर्वसाधारणपणे 60-70 टक्के इतके आहे. महिला शेतकऱ्यांची विविध संसाधनापर्यंत बिनपुरवठा, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, माहिती विश्लेषण सेवा, शेतमाल तारण योजना, तसेच विविध शासकीय योजना इ. पर्यंत पोहच कमी पडते. कृषी मूल्यवृध्दी साखळीच्या उत्पादन टप्प्यावर महिलांचे प्रमुख योगदान दिसत असले तरी काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये घाऊक विक्रेते, अधिकृत विक्रेते, किरकोळ विक्रेते, निर्यातदार इ. भूमिकेमध्ये सहभाग वाढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. महिलांचा कृषि क्षेत्रामध्ये सहभाग वाढविण्यासाठी सन 2022 हे वर्ष ‘महिला शेतकरी सन्मान वर्ष’ म्हणून साजरे करण्यात आले. त्याविषयी माहिती देणारा लेख..
महिला आणि कृषी क्षेत्र
पुरुषांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांचे प्रमाण 15 टक्के इतके आहे. त्यामध्ये 80 टक्के महिला अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. सन 2010-11 मध्ये राज्यामध्ये महिला खातेदाराची संख्या 20.52 लाख होती व त्यांचे एकूण क्षेत्र 25.85 लाख हेक्टर होते. सन 2015-16 ला त्यामध्ये वाढ होवून 23.64 लक्ष झाली व त्यांचे एकूण क्षेत्र 28.85 लक्ष झाले आहे.
विविध उपक्रम
रोजगाराचे निमित्ताने ग्रामीण भागातून पुरुषांचे शहराकडे स्थलांतर वाढत असल्यामुळे शेती कामाचा भार हा प्रामुख्याने महिलांवर वाढत आहे. शेतीमधील ठराविक कामे उदा. नांगरणी, पेरणी वगळली तर उर्वरित सर्वच कामे (निंदणी, वेचनी, कापणी, फळे-भाजीपाला काढणी, पॅकिंग, प्राथमिक प्रक्रिया इ.) प्राधान्याने महिलाच करतात. प्रत्यक्ष शेतावर महिला राबत असल्या तरी प्रशिक्षण, चर्चाक्षेत्र, मेळावे इ. उपक्रमांची महिलांना माहिती देण्यात आली. त्यामुळे पीक व्यवस्थापनाबद्दल माहिती, विस्तार सेवा व तंत्रज्ञान इत्यादी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. शेतकरी म्हणून महिलांच्या क्षमता विकसित होण्यासाठी हा प्रमुख अडसर दूर होईल. पर्यायाने त्यांना स्पर्धात्मक कृषिमूल्यवृध्दी साखळीमध्ये गुणात्मक सहभाग घेऊन त्याचा परिणाम कृषि उत्पादन व कृषि उत्पन्नावर होताना दिसून येईल.
सहभाग वाढवण्यासाठी प्रशिक्षणावर भर
महिलांना तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच सप्रशिक्षणावर भरकारात्मक दृष्टीकोन, ज्ञान, कौशल्य वाढविणेसाठीच्या प्रशिक्षणावर भर देवून निर्णयशक्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये कृषिला सहाय्यभूत सेवा पुरविण्यासाठी महिला शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेतल्या. महिलांची क्षमता बांधणी करणेसाठी ग्रामीण महिलांना प्रशिक्षित करून शेतीमध्ये परिणामकारकरित्या व सक्षमरित्या सहभागी करून घेणे, तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच व्यवस्थापकीय, संघटनात्मक, निर्णयक्षमता, सकारात्मक दृष्टीकोन, ज्ञान, कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण देणे, शेती व्यवस्थापनासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे व समान संधी उपलब्ध करून त्याचे सक्षमीकरण करणे, कृषि विषयक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे, महिलांना शेती व्यवस्थापनामध्ये आत्मनिर्भर करणे, विविध संसाधने जसे की वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, माहिती विश्लेषण सेवा, तारण योजना इ. योजनांची माहिती देवून कृषि विभागाच्या विविध योजना, उपक्रम यामध्ये प्रामुख्याने महिला शेतक-यांचा समावेश करणे, त्यांना जादाचे अनुदान देणे, काढणीपश्चात व्यवस्थापन व विपणन प्रक्रियेमध्ये समूहक, घाऊक विक्रेते, अधिकृत विक्रेते, किरकोळ विक्रेते व निर्यातदार इ. भूमिकेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
प्रशिक्षण, चर्चासत्र, मेळावे, प्रदर्शन इ. उपक्रम राबवून स्पर्धात्मक कृषिमूल्य साखळीमध्ये गुणात्मक सहभाग वाढविणे, महिलांचा सहभाग असलेले प्रकल्प प्राधान्याने निवड करणे,स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास करणे, महिला शेतक-यांचा WhatsApp Group तयार करणे, रिसोर्स बैंक तयार करणे, महिलांचे अभ्यासदौरे आयोजित करून ज्ञानवृध्दी करणे, राज्यातील महिला शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे इत्यादी उपक्रम यावर्षात राबविण्यात आले.
महिलांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी कृषी विभागाने राबवलेल्या महिला मेळावे, प्रदर्शन, एक ते तीन दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषि स्वावलंबन योजना - सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे, सुक्ष्म कृषि माल प्रक्रिया युनिट स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचा विकास करणे, परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिकांची लागवड योजना या सर्व बाबींमुळे शेतकरी महिलांचे कृषि क्षेत्रात सक्षमीकरण निश्चितच होईल.
संकलन : विभागीय माहिती कार्यालय, पुणे