सातारा - संवाद वारी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या गावी गेल्यानंतर या योजनांचा नक्की लाभ घेऊ अशा भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. लोणंद, ता. खंडाळा येथे आयोजित संवाद वारी उपक्रमास भेट दिल्यानंतर वारकऱ्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
तसेच या उपक्रमामुळे अनेक योजनांची माहिती मिळाली असून शासन राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाचे आभार व्यक्त केले.
परभणी येथील गजानन शिंदे म्हणाले, आमचे कुटुंब शेतकरी कुटुंब असून आमच्यासाठी शासन चांगल्या योजना राबवत आहे. काही योजनांचा लाभ घेतला आहे. पण आता आम्हाला आणखी ही योजनांची माहिती मिळाली आहे. गावी गेल्यानंतर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून या योजनांची माहिती घेऊ व त्याचा कसा लाभ घेता येईल हे पाहू.
अशाच भावना इतर अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा संवाद वारी हा उपक्रम प्रदर्शन, पथनाट्य, लोककला आणि चित्ररथ या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने राबवण्यात येत आहे. लोणंद येथे हजारो वारकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली तसेच पथनाट्य, चित्ररथ माध्यमातूनही योजनांची माहिती जाणून घेतली.












